Akola : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप देखील पूर्ण ताकदीनिशी तयारीला लागली आहे. विदर्भातील पाच मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेता तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 मार्चला अकोला शहरात येणार आहेत. भाजपसह एकनाथ शिंदे गटाचे खासदार असलेल्या विदर्भातील पाच मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे धक्कातंत्राचा वापर करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे भाजपा पदाधिकारी अमित शाह यांच्या प्रस्तावित अकोला दौऱ्यामुळे धास्तावले आहेत.
एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ शकते. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या रणधुमाळीला सुरूवात होईल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणूकादेखील होऊ शकतात. या निवडणुकींसाठी सर्व प्रमुख पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. नेते तसेच निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. निवडणुकीअगोदर जास्तीतजास्त मतदारांशी संपर्क करण्याचे पक्ष व नेत्यांचे उद्दिष्ट आहे. निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी करण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम विदर्भातील भाजपचा गड म्हणून ओळख असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह येत आहेत. विदर्भातील पाचही लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह 20 संघटनमंत्री, विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर आदी या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. बाळापूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये ही बैठक होईल
उमेदवाराच्या नाव होणार निश्चित ?
संजय धोत्रे हे विभागात भाजपचे एकमेव खासदार आहेत. लोकसभेच्या दोन निवडणुकीचा अपवाद वगळता, साडेतीन दशकांपासून भाजपने या मतदारसंघात आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. खासदार धोत्रे हे तूर्तास प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबातील व्यक्तीस दिली जाते की दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला जातो, हा भाजप व नागरीकात चर्चेचा विषय आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अकोला दौऱ्यात उमेदवाराचे नाव निश्चित होऊ शकते.