अकोला : शहर कोतवाली पोलिस स्टेशनजवळ शालीनी टॉकिजच्या बाजूला असलेल्या नाल्यावर करण्यात आलेले पक्के बांधकाम अकोला महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले. महापालिकेच्यावतीने शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजतापासूनच या कारवाईला सुरुवात करण्यात आली.
जय हिंद चौकातून कोतवाली पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळीच पोलिसांनी लोखंडी कठडे उभारले. त्यानंतर महापालिकेच्या पथकांनी जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने ईमारतीचे पक्के बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सकाळी लवकर कारवाईला सुरुवात केल्यानंतरही कोतवाली चौकात नागरिकांची चांगलीच गर्दी जमली होती. ही ईमारत नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आल्याने पाडण्यात आल्याचे तेवढे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी जुने शहरातील एक पक्के अनियमित बांधकाम स्फोटकांच्या सहाय्याने पाडण्यात येणार होते. हे बांधकाम पाडण्याच्या तयारीत अधिकारी असताना मंत्रालयातून स्थगिती आल्याने कारवाई टळली होती. दरम्यान अकोल्यात अनेक अशी बांधकामे आहेत जी अनियमित आहेत. त्यांच्याकडेही महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. अकोला महापालिकेच्यावतीने शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कौतुक करण्यात आले. महापालिकेने गुलजारपुरा येथील हिंदु स्मशानभूमिवर झालेल्या अतिक्रमणावरही कारवाई करावी, अशी मागणीही ठाकरे गटाने केली आहे.