Ramdas Athavale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नीकटवर्तीय तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकोला महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे यांचेवर पोलिसांनी एमपीडीए (MPDA) अंतर्गत कारवाई केली आहे. गजानन कांबळेवर यापूर्वी अनेक गंभीर दाखल आहेत. खून, खंडणी, बलात्कार मारहाणीसह अनेक गंभीर गुन्हे कांबळेविरुद्ध दाखल आहेत. झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही कारवाई केली जात आहे.
गुन्हेगारी इतिहास असलेल्या राजकीय क्षेत्रातील व्यक्तींविरोधातही अकोला पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार बुधवारी (ता. 28) पहिली मोठी कारवाई करण्यात आली. गजानन कांबळे याला पोलिसांनी अटक करीत कारागृहात डांबले. आता एक वर्षासाठी कांबळे अकोला कारागृहात राहणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गजानन रिपाइं आठवले गटाचे अकोला महानगराध्यक्ष आहे. 2017 मध्ये गजानन कांबळेच्या पत्नीला आठवले गटाकडून महापालिका निवडणुकीची उमेदवारी मिळाली होती. मात्र निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या.