अकोला : अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांच्याशी ऑटो चालकाने असभ्य वर्तन केल्यानंतर अकोला पोलिस खडबडून जागे झाले आहे. वसंत खंडेलवाल प्रकरणानंतर मंगळवार, २३ मे २०२३ रोजी तातडीने पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शहरातील ऑटो चालकांची बैठक घेत त्यांना सूचना वजा ईशारा दिला.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या दालनात झालेल्या बैठकीला शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विष्णू किनगे, आरटीओ कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक प्रफुल्ल मेश्राम, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मनोज शेळके यांच्यासह शहरातील विविध ऑटो संघटनांमधील २३ पदाधिकारी उपस्थित होते.
ऑटो चालकांनी गणवेशासह बॅचबिल्ला लावावा, नागरिकांशी सौजन्याने वागावे. वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहनाची कागदपत्र सोबत ठेवावी, शहर परमीटच्या ऑटो चालकांनी ग्रामीण भागात वाहतूक करू नये, ऑटोवर बॅच नंबर लिहावा. बाहेरील जिल्ह्यातून आलेले ऑटोंची माहिती पोलिस व आरटीओला द्यावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासोबत ऑटो चालकाने केलेल्या असभ्य वर्तनाची चर्चाही यावेळी होती. असे प्रकार यापुढे कुणाच्याही बाबत घडू नये अशी सूचना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी दिली.