अकोला : सोशल मीडियावरील चॅटिंग व्हायरल करीत अकोल्यात घडविण्यात आलेल्या जातीय दंगलीमागे आणखी कुणी गॉडफादर आहे काय, याचा शोध अकोला पोलिस आता घेत आहेत. याप्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
दोन्ही युवकांमध्ये चॅटिंगला सुरुवात कशावरून झाली. मोहता मिल परिसरात राहणारा २३ वर्षीय विद्यार्थी खरोखर ईतका मोठा जमाव गोळा करण्यास सक्षम होता काय, जेणे करून जातीय हिंसाचार होईल याचा तपास आता यंत्रणा करीत आहे. मोहता मिल भागातून ज्या विद्यार्थ्यांला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने लोकांना कुणाच्या सांगण्यावरून चिथावणी दिली काय, विद्यार्थ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पडद्यामागून दुसरीच कोणीतरी दंगल भडकवली याचा तपासही रामदासपेठ आणि जुने शहर पोलिस करीत आहेत.
पोलिसांच्या चिंतेची बाब म्हणजे यंदाच्या हिंसाचारात प्रथमच अल्पवयीन तरुणांचा समावेश आढळला आहे. अकोला सुरुवातीपासूनच अतिसंवेदनशील शहरांच्या यादीत आहे. आतापर्यंत येथे झालेल्या दंगलींमध्ये अल्पवयीन तरुणांना अटक झाल्याचे ऐकिवात नाही. परंतु यंदाच्या दंगलीत तर अल्पवयीन तरुण सापडत असतील तर ही गंभीर बाब असल्याचे पोलिस आणि समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यावरुन बालवयातच तरुणांचे माथे भडकाविण्याची कामे अकोल्यात होत असल्याचे यावरून सिद्ध होते.
अकोल्यात दंगल होऊ शकते हे राज्य गुप्तवार्ता विभागाने (एसआयडी) पाच महिन्यांपूर्वीच पोलिसांना कळविले होते. एसआयडीच्या गुप्त अहवालात नावे असलेल्यांचा समावेश या दंगलीत आहे काय, याचाही तपास करणे गरजेचे झाले आहे. तसे असल्यास ज्या भागांचा उल्लेख एसआयडीने आपल्या अहवालात केला होता, त्या भागांमध्ये आतापासून नव्याने गस्त वाढविणे गरजेचे आहे. अन्यथा अकोला पोलिसांना गाफिलपणा पुन्हा अंगलट येऊ नये, अशी नागरिकांची भावना आहे.