अकोला : जिल्ह्यातील विविध समस्यांकडे उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यासाठी जात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. जिल्ह्यातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी जात असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी सांगितले मात्र पोलिसांनी हे निवेदन एसीसी क्लबच्या मैदानावर देता येणार नाही, असे आंदोलकांना सांगितले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश मिश्रा आणि तरुण बगेरे यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्ते उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी अकोला क्रिकेट क्लब मैदानाकडे निघाले होते. ही माहिती मिळताच जुने शहर पोलिसा ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी आपल्या ताफ्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांना गीतानगर परिसरात असलेल्या मानव शो-रुमजवळ अडविले. ‘आम्हाला कोणतेही आंदोलन करायचे नाही. आम्ही केवळ निवेदन देण्यासाठी जात आहोत’, असे ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांनी स्पष्ट केले. मात्र उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी दोन्ही पदे फडणवीस यांच्याकडे असल्याने उगाच कोणतेही प्रकरण अंगलट यायला नको म्हणून पोलिसांनी मिश्रा, बगेरे व त्यांच्या सहकाऱ्यांना एसीसी मैदानावर जाण्यापासून रोखले व नंतर ताब्यात घेतले. यावेळी पोलिस व आंदोलकांमधये बाचाबाचीही झाली.
पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मार्गावरून जाणे-येणे करणार आहेत, त्या मार्गांवरील बंदोबस्त वाढविण्यात आला. उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात ‘अॅन्टी डेमो व्हॅन’ला सतर्क करण्यात आले. कोणीही उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडविणार नाही, यासंदर्भातील सूचना पोलिस विभागाला देण्यात आल्या. त्यामुळे विमानतळ ते एसीसी मैदानाच्या परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.