Home » आमदाराला धमकाविणारा ऑटोचालक पकडला

आमदाराला धमकाविणारा ऑटोचालक पकडला

by नवस्वराज
0 comment

अकोला : राज्यातील सत्ताधारी पक्षाचे अकोल्यातील विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल यांना धमकाविणाऱ्या ऑटो चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. घटना घडल्यानंतर रात्रीतूनच सूत्रे हलवित पोलिसांनी एम.एच.३०-एए ५६३१ क्रमांकाचा ऑटो चालविणाऱ्या चालकाला ताब्यात घेतले.

रविवार, २१ मे २०२३ रोजी रात्री दहाच्या सुमारास गोरक्षण मार्गावरील खंडेलवाल भवन येथे हा प्रकार घडला होता. ऑटोतून आलेल्या लोकांनी लुटण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार याप्रकरणी आमदार खंडेलवाल यांनी दिली होती. आमदार खंडेलवाल हे अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. ऑटो चालकासोबत दोन लोक होते, असेही सांगण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात अकोला पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. वसंत खंडेलवाल हे लोकप्रतिनिधीसोबतच पश्चिम विदर्भातील मोठे सराफा व्यापारी आहेत.

गांधी रोडवरील सराफा दुकानातून खंडेलवाल भवनामागील आपल्या घरी सोने खरेदी-विक्रीची रक्कम घरी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. आमदार वसंत खंडेलवालांनी याप्रकरणी खदान पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अकोल्यातील दंगलीनंतर थेट सत्ताधारी आमदाराला लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला आहे. जुने शहरातील दंगलीदरम्यान सुरक्षा रक्षकाने पुरेशी काळजी न घेतल्याने आमदार वसंत खंडेलवाल यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला परत पाठविले होते. तेव्हापासून पाच दिवस झाले तरी आमदार खंडेलवाल यांना कोणताही पर्यायी सुरक्षा रक्षक पुरविण्यात आला नव्हता. अशात हा प्रकार घडल्याने पोलिस यंत्रणा किती सतर्क आहे, याची प्रचिती येते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!