Home » भाजप म्हणाले, बाप्पा पुन्हा मोदीच पंतप्रधान होऊ दे

भाजप म्हणाले, बाप्पा पुन्हा मोदीच पंतप्रधान होऊ दे

by नवस्वराज
0 comment

अकोला : लोकसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला तरी त्याची तयारी संपूर्ण देशात आतापासूनच सुरू झाली आहे. देशात २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान होऊ नये म्हणून ‘इंडिया’ आघाडीतील अनेक नेत्यांनी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. अशात भाजपाच्या जागांमध्ये वाढ व्हावी व नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावे, यासाठी भाजपने विघ्नहर्ता गणपती बाप्पालाच साकडं घातलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पर्यायाने मोदींच्या मार्गातील सर्व विघ्न दूर कर, अशी प्रार्थना अकोल्यातील भाजपच्या कार्यालयात करण्यात आली. २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार सत्तेत येण्यासाठी अकोला भाजपच्यावतीने गणपती अथर्वशीर्ष व ‘गण गणात बोते, श्री गजानन, जय गजानन’ मंत्रजप करण्यात आला. भारत महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण व्हावे, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी सुखी-समृद्ध व्हावा यासाठी वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने विशेष प्रार्थना देखील भाजपच्यावतीने करण्यात आली.

सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. काँग्रेससह भाजप आणि ईतर पक्षही या तयारीला लागले आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणल्या जात आहे. मोदी किती महान नेते आहेत, यासदंर्भात भाजप प्रचार करीत आहे. तर मोदींमुळे भारताचे किती नुकसान झाले हे सांगण्यात काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी मग्न आहे. अशात अकोल्यात गजानन महाराज पुण्यतिथी व गणेशोत्सवानिमित्त गणपती अथर्वशीर्ष, नामजप कार्यक्रम भाजपच्या अकोला कार्यालयात घेण्यात आला. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना सध्या अकोला भाजपकडुन ‘प्रोजेक्ट’करण्यात येत आहे. त्यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. त्यानंतर २७ जोडप्यांनी गणपतीला साकडं घातलं. मंत्रोच्चारात गणपती अथर्वशीर्षाचे २५१  पाठ करण्यात आले. ‘गण गणात बोते’, ‘जय गजानन,श्री गजानन’चा जप करून सप्तऋषींचे स्मरण करण्यात आले. माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित साऱ्यांनीच केंद्रात पुन्हा मोदी सरकार यावं यासाठी प्रार्थना केली.
उत्सवाचा काळ असल्याने विविध राजकीय पक्षांकडुन त्याचा प्रचारासाठी पूर्णपणे वापर करण्यात येत आहे. अकोल्यात श्रावणात आयोजित कावड यात्रेदरम्यान सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी शक्ती प्रदर्शन केले. आता गणेशोत्सवातही विविध कार्यक्रम, उपक्रम, आरत्या, शिबिरांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क सुरू आहे. लवकरच ईद-ए-मिलाद साजरा होणार आहे. या काळात मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्नही सर्व राजकीय पक्षांचा राहणार आहे. पितृपक्ष सोडला तर येणाऱ्या नवरात्रोत्सवातही राजकीय दांडिया रंगणार आहेत.

error: Content is protected !!