पुणे : पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराच लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत. यावेळी मंदिर ट्रस्टच्यावतीने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून विशेष तुकाराम पगडी मोदींना भेट देण्यासाठी बनविण्यात आली आहे. त्यावरील अभंग अचानक बदलण्यात आला आहे.
सुरुवातीला या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हा अभंग टाकण्यात आल्या होत्या. परंतु, यावर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर आता देहू संस्थानाने हा अभंग बदलल्या आहेत. आता या पगडीवर ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ असा नवीन अभंग टाकण्यात आल्या आहेत.
आधी देखील पुण्यात मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून देण्यात आलेल्या फेट्यावर शिवमुद्रा होती. मात्र, त्याला आक्षेप घेतला गेल्याने तीही काढण्यात आली होती. आता पगडीवरील अभंग बदलण्यात आला आहे . पगडी अगदी साध्या पद्धतीने बनविली जाणार आहे. त्या काळी जे कापड पगडीसाठी लागायचे त्याच पद्धतीच्या कापडाने हे पगडी आणि उपरणे बनविले जात आहे.पगडीवर तुळशीच्या माळांची सजावट असणार आहे. या पगडीची केस आणि स्टँडही वैशिष्ट पूर्ण बनविण्यात आला आहे. पगडीचा स्टॅडच्या दोन्ही बाजूला लोड आहे. या सोबतच वर चीपळ्या ठेवण्यात आल्या आहेत. त्याला टाळांची सजावटही करण्यात आली आहे. या साठी डिझायनर उपरणे तयार करण्यात येत आहे. ऑफ व्हाईट रंगाची ही पगडी राहणार आहे. याच कापडाचे उपरणेही बनविले जाणार आहे. याच कापडावर तुकोबांचे निवडक अभंग लिहिले जाणार आहे. जगतगुरू तुकाराम आणि मोदी यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. यामुळे जेव्हा पंतप्रधान मोदींचा सत्कार ही पगडी घालून होईल. तेव्हा तुकाराम महाराजांचे विचार आणि त्यांचे आशीर्वाद या माध्यमातून मिळेल, अशा सूचक पद्धतीने हे अभंग लिहिण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.