कोल्हापूर: होमिओपॅथीमध्ये एम.डी. पर्यंत शिक्षण घेणाऱ्या एका डॉक्टरने गिधाडांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. गिधाडांची घटती संख्या हा दक्षिण आशियात एक गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे गिधाडांच्या संवर्धनाला चालना मिळावी यासाठी डॉ. प्रमोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खास वेबसाइटच तयार केली आहे.
http://www.savevultures.org/ अशी ही वेबसाइट आहे. २९ वर्षांचे डॉ. प्रमोद पाटील हे कोल्हापूरचे असून त्यांनी होमिओपॅथीमध्ये एम.डी पर्यंत शिक्षण घेतले आहे. सध्या शिक्षणासाठी ते पुण्यात आहेत. त्यांनी आणि त्यांचे पुण्यातील सहकारी ग्राफिक डिझायनर गौरव महाजन (वय २७), पक्षीतज्ञ क्षितिजा कुलकर्णी (वय २५), पर्यावरणप्रेमी अनुज खरे (वय ३२) आणि मेकॅनिकल इंजिनीअर सौरभ इंगळे यांनी ही वेबसाइट बनवली आहे. गिधाड दिसले तर त्याची माहिती या वेबासाइट देता येते. ही माहिती नंतर वनखात्याला कळवली जाते. यातून गिधाडांचे दुर्लक्षित अधिवास लक्षात येतात आणि त्या ठिकाणी संवर्धन आणि संरक्षणासाठीचे कार्यक्रम राबवले जाणे शक्य होते’ असे पाटील यांनी सांगितले.