अश्विन पाठक | Ashvin Pathak
Khamgaon Thesil : एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असतांना आता धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या दिवसांपासून धनगर समाजाचे दोन युवक तब्बल दोनशे फूट टॉवर वर चढून अन्नत्याग आणि अर्धनग्न आंदोलन करीत होते. अखेर या दोन्ही युवकांना प्रशासनाने आपत्कालीन बचाव पथकाच्या साहाय्याने खाली उतरविण्यात आले आहे. आपत्कालीन पथकाकडून हे रेस्क्यू ऑपरेशन गुरुवारी (ता.15) राबविण्यात आले.
मराठा आरक्षणाची मागणी तीव्र होत असतानाच धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी तीव्र होऊ लागली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा या मागणीसाठी यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर व जिल्हा उपाध्यक्ष नवनीत सोनाळकर या दोन युवकांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील टॉवरवर चढून अर्ध नग्न व अन्नत्याग सुरु केले. गेल्या दोन दिवसांपासुन या युवकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. धनगर समाजातील मुले शिक्षण घेऊनही आरक्षण मिळत नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. मात्र, सरकारकडून धनगर समाजावर नेहमीच अन्याय करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकार इतर समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे. मात्र धनगर समाजाला अद्यापही अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले नसल्याचा आरोप करीत दोन युवकांनी बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथे 200 फूट टॉवर चढून आंदोलन सुरू केले होते. नवनित सोनाळकर आणि येथील गजानन बोरकर या दोघांनी टॉवर वर चढून अन्नत्याग आणि अर्धनग्न आंदोलन सुरू केले होते. दरम्यान या दोघांची प्रकृती खालावली होती. आंदोलन चिघळू नये म्हणून प्रशासनानं या आंदोलनात सहभागी युवकांना युवकांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न केले. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानंतर 14 फेब्रुवारी रोजी रात्री अकोला येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (ता.15) रोजी पथकाने टॉवर वर चढून उपोषण कर्त्यांसोबत चर्चा करुन त्यांचे समुपदेशन केले. दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन राबवित या दोघांना अखेर खाली उतरविण्यात आले. या युवकांना खाली आणण्यासाठी पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात यावा. या प्रमुख मागणी साठी आंदोलन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात धनगर समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. याकरिता गेल्या 15 दिवसांपासून धनगर समाजाचा युवक नंदू लवंगे हा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषणास बसला आहे. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने तीन दिवसांपूर्वी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे सातत्याने धनगर समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे.