Mumbai : वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला. समन्वय समितीच्या बैठकीत तसे पत्र त्यांना पाठवून वंचितच्या प्रतिनिधींना आमंत्रितही करण्यात आले. मात्र ‘आघाडीत आमचा सन्मान झाला नाही, जागावाटपावर ठोस फॉर्म्युला अजून ठरवलेला नाही’ असे सांगत वंचितचे प्रतिनिधी बैठकीतून निघून गेले. प्रकाश आंबेडकर यांनीही त्याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. मात्र काहीही झाले तरी भाजपला हरवण्यासाठी आघाडीत राहू व 2 फेब्रुवारीच्या बैठकीस हजर राहू,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात मविआच्या समन्वय समितीची तिसरी बैठक मंगळवारी झाली. काँग्रेस, उद्धवसेना व राष्ट्रवादी (शरद पवार गट) या पक्षांचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. वंचितचे नेते धैर्यशील फुंडकर म्हणाले , ‘मी आघाडीच्या बैठकीत सहभागी झालो होतो. सुरुवातीला त्यांनी आमच्या प्रस्तावाबाबत विचारणा केली. त्यावर मी जागावाटपाचे ठरल्याशिवाय भूमिका मांडणार नसल्याचे सांगितले. त्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मला काही वेळाने बोलावतो, असे सांगत खोलीच्या बाहेर बसण्यास सांगितले. नंतर जवळपास दीड तास मी बाहेरच होतो, मला आत बोलावले नाही.’
काँग्रेसला 20 ते 21, उद्धवसेनेला 17 ते 18 व राष्ट्रवादीला 6 ते 7 तर वंचितला 2 ते 3 जागा मिळू शकतात. राजू शेेट्टींसह इतर छोट्या पक्षांना काँग्रेसच्या कोट्यातून गरजेनुसार जागावाटप केले जाईल. 2 फेब्रुवारी रोजी अजून एक बैठक होणार आहे, त्या वेळी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील. त्यात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.