Home » Buldhana Lok Sabha : संजय रायमुलकर, रविकांत तुपकर यांच्यात कलगितुरा

Buldhana Lok Sabha : संजय रायमुलकर, रविकांत तुपकर यांच्यात कलगितुरा

Sanjay Raymulkar : आमदार म्हणाले, तुपकर यांच्या कानशिलात लगावू

by नवस्वराज
0 comment

Ravikant Tupkar : लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असल्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांचे बॅनर झळकले आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे देखील लोकसभा निवडणुक लढवणार आहेत. अशात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांची जीभ तुपकरांवर टीका करताना घसरली.

रायमुलकरांनी एका जाहीर सभेत रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी अॅड. शर्वरी तुपकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली. रविकांत तुपकर यांच्या सभेत घुसून कानाखाली आवाज काढावा लागेल, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले. मेहकर तालुक्यातील उकळी – सुकळी गावात झालेल्या जाहीर सभेत आमदार रायमुलकर बोलले. खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनीही तुपकरांवर टीकास्त्र डागले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार असून (Buldhana Loksabha Constituency) मी संसदेत निवडून जाणारच असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे. 2024 मधील लोकसभा निवडणूक लोकसहभागाने आणि लोकवर्गणीतून आम्ही लढणार आहोत. ‘एक व्होट आणि एक नोट’ या तत्त्वावर मी निवडणूक लढणार आहे, कारण मी फाटका माणूस असल्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करीत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली असता बुलढाण्यातील राजकारण आता थेट धमकीपर्यंत गेले आहे. रविकांत तुपकर यांच्या कानाखाली आवाज काढावा लागेल, असे वक्तव्य आमदार संजय रायमुलकर यांनी जाहीर सभेतून केले. रायमुलकरांच्या या वक्तव्याला तुपकरांनी प्रत्युत्तर देत, मी असल्या पांचट धमकीला घाबरत नाही, असे स्पष्ट केले आहे. आपल्याला मिळत असलेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे आमदार संजय रायमुलकर आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असे तुपकर म्हणाले. मी नावापुरता भूमिपुत्र नाही, शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढणे गुन्हा असेल, तर असे हजारो गुन्हे करण्यास तयार आहे. दादागिरी कराल तर शेतकरी तुम्हाला धडा शिकवतील असा इशाराही तुपकरांनी दिला. मी देखील जशाचतसे उत्तर देऊ शकतो, परंतु माझे संस्कार मला पातळी सोडून वागण्याची परवानगी देत नाही, असा टोलाही रविकांत तुपकरांनी लगावला.

लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच पक्षांचे नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाल्याचे बघायला मिळत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राजकारण चांगलेच तापले आहे.

Buldhana Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांची अटक चुकीची ठरवत मुक्तता

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!