नागपूर : महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेले राज्य सरकार हे घटनाबाह्य आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे सरकार संविधान आणि कायद्याशी खेळ खेळत आहे. वेळ मारून नेत आहे. महाविकास आघाडी सरकामध्ये गद्दारी करणारे ४० आमदार चुकीचे आहेत. त्यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे, असे युवा सेना प्रमुख व शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.
महाराष्ट्रात अराजकता निर्माण झाली आहे. महिलांना मंत्रिमंडळातून शिवीगाळ होते, वारकऱ्यांवर लाठीहल्ले होतात, आंदोलकांना बदडले जाते, मराठा समाजावर अन्याय होतो परंतु त्यानंतरही सरकार काहीच करू शकत नाही. एक गद्दार आमदार गोळीबार करतो, दुसऱ्या गद्दार आमदाराचा मुलगा अपहरण करतो असा सारा प्रकार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील व केंद्रातील सरकार केवळ फलक आणि जाहिरातबाजीवर खर्च करीत आहे. शेतकरी आणि गरजु लोकांपर्यंत पैसा, मदत, निधी पोहोचतच नाही. माहविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात असताना अनेक योजना कार्यान्वित झाल्या. परंतु सध्याच्या सरकारने केवळ वेळकाढुपणा चालविला आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. कमलनाथ यांच्या निमंत्रणावरून आपण तेथे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मध्य प्रदेशात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. तेथील मराठी प्रचारकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीकडुन जी भूमिका ठरेल त्या हिशोबाचे प्रचार-प्रसाराचे काम ठरेल. मध्य प्रदेशातील निवडणुकीत ठाकरे गट उमेदवार देणार का, याबद्दलचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असे आदित्य यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भूमिका संविधानाला न्याय देणारी असली पाहिजे. आता नार्वेकर एका पक्षापुरते मर्यादीत नाहीत. अध्यक्ष या नात्याने ते एका संवैधानिक सभागृहाचे प्रमुख आहे. त्यामुळे त्यांनी संविधान व कायद्याला अनुसरून निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. अध्यक्षांनी आपली भूमिका चोखपणे बजावली, तर गद्दार आमदारांनी नक्कीच शिक्षा होईल असेही ते म्हणाले.