नागपूर : झारखंड राज्यात सुरू असलेल्या आंदोलनामुळे विदर्भातील रेल्वे प्रवासी सेवा विस्कळीत झाल्याचा प्रकार मंगळवार व बुधवार सलग दोन दिवस जाणवला. महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येही सध्या आरक्षणावरून आंदोलन सुरू आहे. येथील कुर्मी समुदायाचा समावेश अनुसूचित जामातीमध्ये (एसटी) करण्याच्या मागणीसाठी झारखंडमध्ये या समुदायाचे लोक रस्त्यांवर उतरले आहेत. कुरमाली भाषेला संविधानाच्या आठव्या अनुसूचित समाविष्ट करण्याचीही मागणीही कुर्मी समाजाने केली आहे.
या आंदोलनामुळे २० सप्टेंबरला झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवर, रेल्वे मार्गावर बेमुदत रेलरोको आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे महाराष्ट्रातून झारखंड राज्यात प्रवेश करणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग मंगळवारीच बदलण्यात आलेत. काही रेल्वेच्या फेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यात आल्या. रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. मार्ग बदलण्यात आलेल्या व रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये विदर्भातून धावणाऱ्या काही गाड्यांचाही समावेश आहे.
एकूण सात रेल्वे गाड्यांमधील हजारो प्रवाशांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. हावडा, मुंबई, पुणे मार्गावरील या गाड्या असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. या गाड्यांमध्ये एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस, पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, सीएसएमटी-हावडा दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस, एटीटी-कामाख्या कर्मभूमी एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे. यातील बऱ्याच गाड्यांना विदर्भातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबा आहे. आंदोलनाची धास्ती घेतलेल्या रेल्वे प्रशासनाने ऐनवेळी या सर्व फेऱ्या रद्द केल्याने व काही गाड्या अन्य मार्गाने वळविल्याने विदर्भातून प्रवास करणाऱ्या व विदर्भात येण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तिकिटांचे आरक्षण करून ठेवलेल्या अनेक प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी धावाधाव करावी लागली. रेल्वे फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. परंतु सरकारी मालमत्ता व प्रवाशांच्या जिविताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा अप्रिय निर्णय रेल्वे विभागाला घ्यावा लागला, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.