अकोला : गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या श्री वीर हनुमान गणेशोत्सव मंडळाच्या जुने शहराचा राजाचे आगमन शनिवार, १६ सप्टेंबरला थाटात झाले. शनिवारी सायंकाळी लोखंडी पुलावरून आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली. श्री राजराजेश्वर ढोल पथकाच्या शंभरावर कलाकारांनी मिरवणुकीत रंगत आणली. ढोल, ताशाच्या गजरात श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती जयहिंद चौकमार्गे वीर हनुमान चौकात रात्री स्थापना स्थळी पोहोचली.
श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विद्युत रोषणाई, फाटक्यांची आतंशबाजी तसेच ढोल पथकाच्या कलाकारांचे कौशल्य बघण्यासाठी नागरीकांची दुतर्फा गर्दी होती. भव्य मिरवणुकीत लहान मुले व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अत्यंत वर्दळीचा रस्ता असूनही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनास वाहतूक नियंत्रणासाठी सहकार्य केल्यामुळे मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. ‘श्रीं’चे आगमन अत्यंत उत्साहात आणि सुरळीतपणे झाले.