बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वडगाव तेजन गावात मंगळवारी रात्रीच्या सुमारास चार वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी चाकूचा तसेच हत्यारांचा धाक दाखवून लाखोंचा मुद्देमाल लंपास केला.
एकाच दिवशी चार ठिकाणी दरोडा पडल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. पालखी मार्ग शेगाव-पंढरपूर व सुलतानपूर महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वडगाव तेजन येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने दहशत माजवली. ग्रामस्थ गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत रस्त्यावर असलेल्या घरावर सशस्त्र हल्ला करीत दरोडेखोरांनी मध्यरात्री वयोवृद्ध शेतकरी रामकिसन रामराव तेजनकर यांच्या घरात प्रवेश केला.
दरोडेखोरांनी तेजनकर पती-पत्नीला बांधून ठेवत दोघांच्याही गळ्याला चाकू लावला. घरातील दागिन्यांसह मुद्देमाल लंपास केला. दाम्पत्याच्या डोळ्यासमोरच दरोडेखोरांनी मुद्देमाल घेऊन पळ काढला. इतक्यावरच हे दरोडेखोर थांबले नाही. तर त्यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या नारायण तुकाराम कुलाल यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करीत घरामधील मौल्यवान वस्तूंची चोरी केली. जुन्या (वडगाव तेजन) गावांमध्ये राहणाऱ्या विशाल रमेश तेजनकर व इंदुबाई त्रंबक मानवतकर यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारून सोने व रोख रक्कम पसार केली.
एकाच रात्री एकाचवेळी चोरट्यांनी सशस्त्र टाकलेल्या दरोडयात ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार रामकिसन रामराव तेजनकर यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिली. विशाल रमेश तेजनकर यांच्या घरातील ३२ हजारांची रोख रक्कम अडीच ते तीन तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. इंदुबाई त्र्यंबक मानवतकर यांच्या घरातील २० हजार रुपयांची रोख रक्कम आणि मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या दरोड्याची माहिती मिळताच लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिनिश मेहेत्रे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांकडून सध्या दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.