नागपूर : महाराष्ट्रातील विद्यापीठांचा कारभार सुधारण्याची नितांत गरज आहे. विद्यापीठात विद्यार्थ्याच्या समस्या सुटत नसल्याने ते तक्रार घेऊन राज्यपालांकडे येतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची आणि चिंतेची विनम्रपणे आणि निकडीच्या भावनेने उत्तरे देण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठांची आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी विद्यापीठांनी त्यांच्या कारभारात सुधारणा कराव्या, अशा स्पष्ट सूचना देत, राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना कानपिचक्या दिल्या.
नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने शताब्दी वर्षानिमित्त सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर उपस्थित होते. याशिवाय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे उपस्थित होते.
आपल्या भाषणात राज्यपाल बैस म्हणाले की, विद्यापीठांमध्ये निकाल उशिरा येणे, परीक्षेबाबतच्या समस्या आणि इतर कारणांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा अधिकार कुणालाही नाही. सर्वोत्कृष्ट प्राध्यापकांच्या भरतीकडे विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी तातडीने लक्ष दिले पाहिजे. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ३० ते ४० टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जगातील सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये, शिक्षकांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांकडून केले जाते. विद्यार्थ्यांचे शिक्षक मूल्यमापन आमच्या महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येदेखील सुरू केले पाहिजे. विद्यापीठांच्या मानांकनाइतकेच शिक्षकांचे मानांकन महत्त्वाचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगली महाविद्यालये आणि विद्यापीठांची निवड करण्यास मदत होईल. असेही राज्यपाल म्हणाले.
विद्यापीठाच्या या कार्यक्रमात जीवन साधना पुरस्कार, आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक, प्राचार्य बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक, शताब्दी महोत्सव सुवर्णपदक, आदर्श अधिकारी पुरस्कार (वर्ग १), आदर्श अधिकारी पुरस्कार (वर्ग २), आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ वर्ग ३), आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार (विद्यापीठ वर्ग ४) उत्कृष्ट राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार, उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार, उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट संशोधक पुरस्कार, उत्कृष्ट लेखक या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
डॉ. एच.एफ. दागीनावाला, हरिश्चंद्र बोरकर, प्रा. सुरेश देशमुख, शिवकिसन अग्रवाल, डॉ. निरूपमा देशपांडे यांना जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण संस्था पुरस्कार नागपूरच्या नागपूर गुजराती मंडळाला मिळाला. डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदकाने नागपूरच्या शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. महेंद्र ढोरे यांना गौरविण्यात आले. प्राचार्य श्री बलराज अहेर स्मृती सुवर्ण पदक प्रदीप बिनीवाले यांना प्रदान करण्यात आले. शताब्दी महोत्सव सुवर्णपदकाने डॉ. नितीन डोंगरवार, विभाग प्रमुख वसीम अहमद, प्रवीण गोतमारे, राजेन्द्र बालपांडे, दर्पण गजभिये यांना गौरविण्यात आले.
आदर्श अधिकारी पुरस्कार डॉ. रमण मदने, गणेश कुमकुमवार, प्रदीप घ्यार, अरुण हट्टेवार, विलास घोडे, भास्कर शेंडे यांना प्रदान करण्यात आला. नरखेडचे डॉ. देवेंद्र भोंगाडे यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळाला. डॉ. प्रमोद खेडेकर, डॉ. ईश्वर सोमनाथे उत्कृष्ट शिक्षक ठरले. उत्कृष्ट संशोधनासाठी डॉ. रवींद्र जुगादे, डॉ. रतीराम चौधरी यांना गौरविण्यता आले. डॉ. सत्यप्रकाश निकोसे यांना उत्कृष्ट लेखन पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून साहिल खेलकर, आरजू समीर खान पठाण यांना गौरविण्यात आले. शिवाजी सायन्स कॉलेजचा विशाल खर्चवाल आणि हिस्लॉप कॉलेजची अनुष्का नाग उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले. उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार आशुतोष तिवारी, आश्लेषा खंते यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेसाठी मनीष कडुकर व पृथ्वी राऊत यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. नागपूरच्या तत्कालीन तहसीलदार प्रियदर्शनी बोरकर, मंडळ अधिकारी राजेश देठे, विद्यापीठ अधिवक्ता अॅड. प्रमोद उपाध्याय यांनाही सन्मानित करण्यात आले.