Home » अकोल्यात नियमित भारनियमन सुरू होणार

अकोल्यात नियमित भारनियमन सुरू होणार

by नवस्वराज
0 comment

अकोला : विजेची वाढलेली मागणी तसेच वार्षिक देखभालीसाठी कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेचे दोन विद्युतनिर्मिती संच बंद असल्यामुळे महावितरण कंपनी तर्फे फिडर जी १- २- ३ वर आपत्कालीन भारनियमन राबविण्यात येत आहे. आपत्कालीन भारनियमनाची निश्चित वेळ आणि कालावधी नाही. विजेच्या मागणीत वाढ झाली की भारनियमन घेण्यात येते, पुरवठा आणि मागणीचा मेळ बसला की वीज पुरवठा सुरू करण्यात येतो, अशी माहिती अकोला मंडळ कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली. ३१ ऑगस्टच्या सकाळी दोन तासवर, सायंकाळी पावणेदोन तास तर रात्री दोन तास भारनियमन केले. या व्यतिरिक्त दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता तो वेगळाच.

महावितरण कंपनीचा कारभार अनाकलनीय आहे विदर्भात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होते. भारनियमनाचे चटके मात्र विदर्भ सोसतो. मुंबई आणि पुण्यात भारनियमन नाही. ज्या फिडरवर वीज हानी, चोरी आणि थकबाकी जास्त त्यावर भारनियमन राबवले जाते. ज्या फिडरवर हानी, चोरी, थकबाकी तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे, त्यावर भारनियमन घेण्यात येत नाही. कंपनीच्या लेखी ज्या फिडरवर यांचे प्रमाण अधिक आहे त्यावरील वीज ग्राहक जनावर, चोर, दरोडेखोर असावेत. कंपनीने इतर फिडरवर देखील जी- १- २- ३ च्या निम्मावेळ भारनियमन राबवावे.

महावितरण कंपनीला ऑगस्ट महिन्यात आपत्कालीन भारनियमन राबवावे लागते आहे. पुढील महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास येत्या उन्हाळ्यात ग्राहकांना नियमित भारनियमनाला सामोरे जावे लागेल. दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कंपनीने नेहमी प्रमाणे विदर्भाला वेठीस धरू नये. वीज हानीसाठी महावितरण प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे विशिष्ट फिडरवरील ग्राहकांवर भारनियमन लादून अन्याय करू नये. उठसूठ आंदोलन करणारे राजकीय पक्ष तसेच संघटनांनी हा जिव्हाळ्याचा मुद्दा उचलून धरावा असे अनेक वीज ग्राहकांचे मत आहे.

error: Content is protected !!