Home » अकोल्याच्या बैदपुरा भागात गोदामाला भीषण आग

अकोल्याच्या बैदपुरा भागात गोदामाला भीषण आग

by नवस्वराज
0 comment

अकोला : प्लास्टिक खेळण्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीमुळे अकोला शहरातील बैदपुरा भागात चांगलीच खळबळ उडाली. शहराच्या मध्यवर्ती भागात ही आग लागल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. अरुंद गल्ली असल्याने दुपारपर्यंत आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अडचण येत होती.

खेळण्याच्या गोदामाला लागलेल्या या आगीची भीषणता बघता खुले नाट्यगृहाकडुन फतेह चौकात जाणारा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर आणि शहर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन दलाने परिसरातील अनेक गॅस सिलिंडरही बाहेर काढले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून बैदपुरा भागातील वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांच्या फेऱ्या अद्यापही सुरूच आहे. परंतु ज्या ठिकाणी ही आग लागली, ती गल्लीच अत्यंत अरुंद असल्याने घटनास्थळापर्यंत बंब पोहोचविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकही प्रशासनाला आग विझविण्यासाठी मदत करीत आहेत. आगीत आतापर्यंत लाखो रुपयांच्या प्लास्टिकची खेळणी खाक झाली आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!