अकोला : जुने शहरातील दंगलीनंतर रात्रीची संचारबंदी अद्यापही कायम आहे. अशात सोमवार, २२ मे २०२३ रोजी सकाळी अकोला महापालिकेने दंगलग्रस्त शिवसेना वसाहत भागात अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली. या मोहिमेदरम्यान मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. आयुक्त द्विवेदी त्यावेळी वाहनात नव्हत्या. चालक वाहन चालवित होत. सुदैवाने चालकाला कोणतीही ईजा झाली नाही.
जुने शहरातील नाल्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामात अडथळा येत असल्याचे सांगत अकोला महापालिकेने नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारी सकाळी अचानक अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. जेसीबी आणि महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा जुने शहरातील शिवसेना वसाहत भागात दाखल झाला. जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, जुने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखडे आदी अधिकारी देखील घटनास्थळी होते.
अकोला महापालिका अतिक्रमण हटाव मोहिम राबविणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच देण्यात आली होती. त्यामुळे जुने शहरात दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र अचानक सोमवारी सकाळी ही मोहिम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये रोष पसरला. दंगलीच्या पार्श्वभूमिवर जाणीवपूर्वक महापालिका प्रशासन ही मोहिम राबवित असल्याचा गैरसमज लोकांमध्ये पसरला. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. मात्र दंगलीचा आणि अतिक्रमण हटाव मोहिमेचा आपसात कोणताही संबंध नाही, असे महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई करणे नितांत गरजेचे आहे. जुने शहरातील बहुतांश भागातून मोर्णा नदी वाहते. या नदीला मोठे नाले येऊन मिळतात. या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणामुळे नालेसफाईत अडचण येत होती. त्यामुळे जुने शहर, शिवसेना वसाहत आदी भागातील नाल्यांवरील अतिक्रमण तेवढे काढण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिली. सध्या जुने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दंगलीनंतर लागू करण्यात आलेली रात्रीची संचारबंदीही कायम असल्याचे पोलिसांनी सांगितले.