अकोला : भारताच्या ऑलिम्पिक विजेत्या व इतर खेळाडूंच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस पाठिंबा वाढतच आहे. अकोल्यातूनही या घटनेबद्दल संताप वाढतच आहे. शुक्रवार, १२ मे २०२३ रोजी आंदोलनकर्त्या खेळाडुंच्या समर्थनार्थ अकोल्यात नारीशक्तीने एल्गार पुकारला.
‘आखिर कब तक’ या मोहिमअंतर्गत शुक्रवारी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे स्वाक्षरी आंदोलन करण्यात आले. काळे कपडे परिधान करीत व हातात काळे झेंडे घेत महिलांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या ऑलिम्पिकच्या खेळाडुंना पाठिंबा दर्शविला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंहवर कुस्तीपटुंनी लैंगिक शोषण आणि मानसिक छळाचा आरोप केला आहे. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करणाऱ्या कुस्तीगिरांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे गेल्या काही दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देत अकोल्यात महिला-युवतींनी हातात फलक घेऊन आपला निषेध नोंदविला. ‘बृजभूषणाला अटक झालीच पाहिजे’,‘बृजभूषण शेम-शेम’, ‘बृजभूषणची नार्को टेस्ट करा’‘आरोपी बृजभूणणची पदावरून हकालपट्टी करा,’ ‘आम्ही पदके यासाठी जिंकली होती काय?’, ‘न्याय द्या-न्याय द्या’, ‘लेक वाचवा, लेक बढावा लेक घडवा’,‘आखिर कब तक अन्याय’ आदी घोषणांचा समावेश होता.