अकोला : पतीने त्याच्या नावावर असलेली जागा (फ्लॅट) पत्नीच्या नावावर न करता आईच्या नावावर का केली यावरून दोघा पती-पत्नीमध्ये चांगलाच वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला.
हा प्रकार २२ फेब्रुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील खरप नाल्याजवळ घडलाय. दरम्यान मुलीला भेटण्यासाठी पोहोचल्यावर सासऱ्याने जावयाला जाब विचारला असता, त्याने चाकूने सासऱ्यावरही हल्ला केला. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अकोला जिल्ह्यातील आपातापा रस्त्यावरील संत कबीर नगरातील रहिवासी सदाशिव महादेव भालेराव (वय ७३, सासरे.) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचं २०१७ मध्ये विकास वाल्मीक इंगळे (वय ३१, रा. गोंधापूर) याच्यासोबत प्रेमविवाह झाला. त्यांना एक मुलगा असून विकास हा सैन्य दलात कार्यरत आहे. तेव्हापासून दोघे पती-पत्नी नागपूरला राहतात.
त्यांच्या लग्नाला आई-वडिलांचा प्रचंड विरोध होता. काही दिवसांपूर्वी विकास इंगळे हा सुटीवर आला, म्हणजेच विकास हा पत्नी व मुलासह सासरे सदाशिव भालेराव यांच्याकडे आला. जावई विकास इंगळे याने त्याचा फ्लॅट आईच्या नावाने केला असल्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. माझ्या नावावर न करता फ्लॅट तुम्ही तुमच्या आईच्या नावावर का केला? असे अनेक प्रश्न विकासच्या पत्नीकडून उपस्थित व्हायला लागले. त्यातून वाद होऊ लागले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास दोघेही पती-पत्नी व मुलगा दुचाकीने गोंधापूरला जाण्यासाठी निघाले. विकास इंगळे याने सासूला फोन करून खरप नाल्याजवळ तुमच्या मुलीच्या गळ्यातील चेन कुणीतरी अज्ञात चोरट्याने तोडल्यामुळे तिचा गळा चिरला आहे. तिला शासकीय रुग्णालयात घेऊन जात आहे. याठिकाणी गेल्यावर मुलीने कोणी चोरट्याने चेन चोरली नसून, पतीने म्हणजे विकास इंगळे याने चाकूने गळा चिरल्याचे सांगून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. याप्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी विकास इंगळे याच्याविरुद्ध ३०७ नुसार गुन्हा दाखल केला.