अकोला : शहरातील मार्गांवर आता मोकाट जनावरांना सोडणे महागात पडणार आहे. यापुढे कोणत्याही मोकाट जनावरामुळे वाहतुकीला अडथळा झाल्यास महापालिका ही जनावरे जप्त करून गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देईल असा आदेश जारी करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा अकोला महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांनी हे आदेश काढले आहेत.
शहरात मोकाट श्वान, डुकरे याच बरोबर मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील मुख्य मार्गावर वळू, गाय, म्हशी, वासरु, गोरे, गाढव आदी पाळीव प्राणी ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा होतो. अनेक मुख्य मार्गावर कोणतेही कारण नसताना वळूने अनेक नागरिकांना जखमी केले आहे. याबाबत अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार दिली होती. त्यामुळे या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी यापुढे मोकाट जनावरांच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.