अकोला : नागरिकांच्या समस्या राज्य सरकार पर्यंत थेट पोहोचाव्या म्हणून अकोला जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री विशेष कक्ष (सीएमओ) पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या या जिल्हास्तरावरील विशेष कक्षाचे प्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी काम करतील. त्यांच्या मदतीला एक नायब तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सुधारित आकृतीबंधानुसार अतिरिक्त ठरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या या विशेष कक्षामध्ये सामावून घेण्यात येणार आहे. त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. प्रत्येक जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री कक्षामध्ये येणारी निवेदने आणि पत्र मुंबईच्या मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात थेट पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून समस्याग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांना निवेदन देण्यासाठी मुंबई येथील मंत्रालयाच्या चकरा मारण्याची गरज भासणार नाही.