अमरावती : भाजपचे सहयोगी आमदार आमदार रवी राणा यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. अमरावतीचे महापालिका आयुक्त यांच्यावरील शाईफेक प्रकरणात हा वॉरंट काढण्यात आला आहे. आमदार राणा यांच्या घरी अमरावती पोलिस पोहोचले होते, मात्र आमदार रवी राणा घरी नसल्याने वॉरंट कुणीही स्वीकारला नाही.
सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष एका एका मतासाठी धावपळ करत आहेत. अशातच राणा यांच्या विरोधात वॉरंट आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष चांगलाच पेटला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा हा दबाव आहे. विधानपरिषद निवडणुकीत मी भाजपला मतदान करू नये यासाठी हे सर्व सुरू आहे. तसेच मुंबई पोलिस आयुक्त व अमरावती पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून पोलीस खार मधील घरी आले होते. मला पोलीस शोधत आहेत. पण मी कायदेशीर उत्तर देईन, तसेच भाजपचे उमेदवार निवडून यावे यासाठी मी पूर्ण ताकद लावेन, असे रवी राणा म्हणाले.