अकोला : रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासली, काही समस्या निर्माण झाली की, अकोलेकरांना नाव आठवते ते विपुल माने या तरूणाचे. वर्ष २०११ मधे ‘श्री.छत्रपती प्रतिष्ठान’ची स्थापना त्यांनी केली. आज या संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर भव्य वटवृक्षात झाले आहे. विविध कार्यक्रम, उपक्रम अव्याहतपणे संस्थेमार्फत राबविले जातात.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून आठ हजारावर रूग्णांचे रक्तदान करण्यात आले आहे. यासाठी दररोज १५-२० फोन येतात. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तत्परतेने रक्ताची व्यवस्था करून देतात. हे कार्य २४ तास सुरू असते. ३६५ दिवस. सात थॅलेसेमिया रूग्णांचे पालकत्व संस्थेने स्वीकारले असून, त्यांना वेळोवेळी लागणाऱ्या रक्ताची जबाबदारी घेतली आहे. सामाजिक कामात संस्था सदैव अग्रसर असते. रक्तदानाबाबत समाजात जागृती निर्माण व्हावी, गैरसमज दूर व्हावेत या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यावर विशेष भर दिला जातो.
वृक्षारोपण, संवर्धन, अनाथ, वृध्दाश्रमातील गरजूंना आवश्यक वस्तू पुरविणे, हिवाळ्यात रस्त्यावर राहणाऱ्यांना स्वेटर, ब्लँकेटचे वाटप, एचआयव्ही बाधित उपेक्षित मुलांसोबत सण-उत्सव, वाढदिवस साजरे करणे, निशुल्क आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन, छत्रपती शिवाजी महाराज व महापुरूषांच्या जयंती दिनी विविध उपक्रम राबविण्यात येतात.
प्रतिष्ठानाने कोरोना काळात तसेच कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुरादरम्यान पीडितांना मुक्तहस्ताने मदत केली आहे. विपुल प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष आहे. ‘ह्युमन सोशल फाऊंडेशन’, हनुमानगढ, राजस्थानतर्फे त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ‘रूग्णसेवक पुरस्कार’, ‘स्पेशल अॅप्रिसिएशन अवार्ड’ व विविध कार्यासाठी १५ वर पुरस्कार प्राप्त केले आहेत. इंटरनॅशनल आयकाॅनिक एक्सलंसी अवाॅर्ड आणि इंटरनॅशनल ग्लोरी अवाॅर्डही त्यांना मिळाला आहे. विपुलच्या चिकाटी आणि जिद्दीमुळे प्रतिष्ठानचे कार्य दिवसेंदिवस वृद्धींगत होते आहे. समाजकार्यासाठी झपाटलेल्या विपुलचा आदर्श तरूणांनी डोळ्यासमोर ठेवावा असाच आहे.