अकोला : अमली पदार्थांचे सेवन, रेव्ह पार्टी, गुन्हेगारीच्या विळख्यात आजची तरूण पिढी पुरती गर्तेत गेली आहे. रोज या बाबतच्या बातम्या आपण वाचतो आणि बघतो. परंतु राजराजेश्वर नगरी अकोला येथील काही तरूणांना एका आगळ्या वेगळ्या ध्येयाने झपाटले आहे. ‘शिवराय ग्रुप’ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली आहे. त्याच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येतात.
शासन, प्रशासन व राज्यकर्त्यांच्या उदासीनते मुळे ऐतिहासिक किल्ले व ईमारतींची दुरावस्था झाली आहे. किल्यांचे संवर्धन, दुरूस्ती करणे, परिसराची स्वच्छता ठेवणे, शहरातील घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचवणे, रूजवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. २०१८ पासून शिव राज्याभिषेक पालखी सोहोळ्यानिमित्त ते अकोला ते किल्ले रायगड पालखी दरवर्षी काढण्यात येते. राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात येते.
मलकापूर येथील ‘सूर्योदय अनाथ आश्रमात’ संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते. गेल्या पावसाळ्यात कोल्हापूर येथे आलेल्या विध्वंसक महापूराचे वेळी ‘एक हात मदतीचा’, या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्तांना त्यांचे घरापर्यंत मदत पोहोचवण्याचे कार्य ग्रुप सदस्यांनी केले आहे. यात बारा वर्षापासूनची शेकडो मुले यथाशक्ती योगदान देतात. प्रसिद्धीची अपेक्षा न करता, निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणारी ही तरूण मंडळी खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.