नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विचार आहे. राष्ट्रभक्तीची गंगा आहे. संघासाठी राष्ट्र सर्वतोपरी आहे. संघाची शिक्षा व शिक्षा वर्ग म्हणजे गंगोत्रीप्रमाणे असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने संघ शिक्षा वर्गाचा तृतीय वर्षाचा शुभारंभ रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिभवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. जोशी यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून शिक्षा वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी मंगेश भेंडे यांनी यावेळी देशभरातील सर्व प्रांतांतून आलेल्या शिक्षार्थिंना संबोधित केले.
भेंडे म्हणाले, ‘संघाच्या प्रणालीत तृतीय शिक्षा वर्गाचे महत्त्व अधिक आहे. येथे येणाऱ्या शिक्षार्थींची भाषा वेगवेगळी असली, तरी हृदय एक आहे. संवाद साधण्यात कुठलीही अडचण त्यामुळे येत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. संघ गंगोत्री असल्याने गंगेतून कुणी कितीही पाणी घेतले तरी ते संपत नाही. संघाच्या शिक्षा वर्गातून जितके ज्ञान घ्याल, तितके कमीच आहे. शिक्षार्थ्यांची स्वतःचे विचार, कार्य यावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा आणि समर्पणासह साधना करत प्रत्येक शिक्षार्थीने संघाच्या कल्पनेतील कार्यकर्ता होण्याचा संकल्प करावा’, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला सहसरकार्यवाह रामदत्त, सहसरकार्यवाह मुकुंद उपस्थित होते.
वाढतेय शिक्षार्थींची संख्या
१९२७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिला शिक्षा वर्ग नागपुरातील मोहिते वाडा येथे झाला होता. हा वर्ग सुमारे ४० दिवसांचा होता. वर्गात त्यावेळी एकूण शिक्षार्थींचा समावेश होता. यंदाच्या वर्गात एकूण ७३५ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. शिक्षा वर्गानंतर वाद्याच्या तालावर होणारे शानदार पथसंचलन आकर्षणाचे केंद्र असते.