अकोला : कॉटन सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला शहराची अवस्था पाणी टंचाईमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी या शहराची अवस्था आहे.
पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने वऱ्हाडातील या शहराचा औद्योगिक व एकूणच विकास खुंटला आहे. शहराच्या मध्यभागातून मोर्णा नदी वाहते, परंतु या नदीचे पाणी निरुपयोगीच ठरत आहे. मध्यंतरीच्या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिक पांडे यांनी मोर्णा नदी सफाई मोहिम राबविली. त्याला व्यापक जनसहभाग मिळालाही, परंतु अधिकारी बदलून जाताच नदीचा पुन्हा नाला झाला आहे. अकोला शहराला प्रचंड राजकीय वैभव लाभले आहे. गल्ली ते दिल्ली गाजविणारे अनेक राजकीय नेते अकोल्याला लाभले आहे; तरीही अकाला शहर पाणी पुरवठ्याच्या बाबतीत माघारले आहे.
अकोल्यातून प्रवाही असलेल्या मोर्णा नदीसह कापशी तलाव शहराची तहान भागवू शकतो. कापशी तलाव, काटेपूर्णा प्रकल्प आणि मोर्णा नदीचे शुद्धी केलेले पाणी असा तिहेरी वापर झाल्यास अकोल्याची पाणी वापराची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता आहे, असे जलतज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय अकोला शहरात भूजल पातळी वाढविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र येत व्यापक मोहिम राबविणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यातून खारपाणपट्टा गेला आहे. त्यामुळे अकोला शहरासह आसपासच्या परिसरातील भूजल पातळी जाणीवपूर्वक वाढविणे काळाची गरज बनली आहे. कापशी तलावातील पाणी आजही शहरासाठी वापरता येणे शक्य आहे. २००५ पासून होत असलेला कमी पाऊस व महानगरपालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे अकोला महानगराला जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे.कापशी तलावातील गाळाचा उपसा करून नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु या प्रकल्पाची माशी शिंकली.
मोर्णा नदीची स्वच्छता, भूजल पातळीत वाढ, कापशी तलावाच्या पाण्याचा वापर असे बहुआयामी उपाय झाल्यास अकोल्याची पाणी समस्या सुटेल. मात्र यासाठी सर्वंकष राजकीय ईच्छाशक्ती व सक्षम राजकीय नेतृत्वाची गरज आहे. हे नेतृत्व जोवर अकोल्याला भेटत नाही, तोवर अकोल्याचा घसा कोरडाच राहिल असे नागरिकांचेही म्हणणे आहे.