Home » उमा भारती म्हणतात, राणांच्या साहसाचा गर्व

उमा भारती म्हणतात, राणांच्या साहसाचा गर्व

केंद्र सरकारकडुन मोठ्या लाभाचीही शक्यता

by नवस्वराज
0 comment

नागपूर : मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणाच्या मुद्द्यावरून पोलिस कारवाईला सामोरे गेलेल्या खासदार नवनीत राणा यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री तथा भाजप नेत्या साध्वी उमा भारती यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

राणा दाम्पत्यावर विशेषत: खासदार नवनीत राणांबाबत ट्विट करीत उमा भारती यांनी आपल्याला नवनीत राणा यांचा गर्व वाटतो, असे नमूद केले आहे. ‘नवनीत राणा व रवी राणा यांच्या सुटकेनंतर मला फक्त दिलासाच वाटला नाही, तर त्यांच्या हिमतीचा अभिमानही वाटतो. मी उद्धव ठाकरे सरकारकडून अशी अपेक्षा केली नव्हती. शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या तपश्चर्येतून उदयाला आली आहे. हेच आदरणीय बाळासाहेबांचे संस्कार आणि परंपरा आहे का, यावर सगळ्या शिवसैनिकांनी विचार करायला हवा’, असे उमा भारती यांनी म्हटले आहे.

उमा भारती यांनी आपल्या ट्विटमध्ये खासदार नवनीत राणा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टॅग केले आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पती आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांची भेट झाली. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. राणांच्या समर्थकांनी हा व्हिडीओ ट्विट करीत ‘करारा जवाब मिलेगा’ असे प्रत्युत्तर दिले आहे. प्रकृती खालावल्याने नवनीत राणा यांची मुंबईत एमआरआय चाचणीही करण्यात आली. लिलावती रुग्णालयात त्यांना या चाचण्यांसाठी दाखल करण्यात आले आहे.

राणांना मोठा लाभ निश्चित

केंद्र सरकार अर्थात भाजपशी जवळीक साधल्यानंतर राणा दाम्पत्याला सातत्याने महाराष्ट्र सरकारच्या प्रहाराला सामोरे जावे लागत आहे. अमरावती पोलिसांनी कारवाई केल्यानंतर राणा यांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षाही प्रदान केली आहे. हनुमान चालिसा पठण प्रकरणानंतर केंद्र सरकारच्या नजरेत राणांची प्रतिमा उंचावली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार नवनीत राणा यांना लाभ मिळण्याची शक्यता वाढल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. इतकेच नव्हे तर २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यास त्याचाही लाभ आमदार रवी राणा यांना निश्चित मिळेल असे मानले जात आहे.

error: Content is protected !!