मुंबई : अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांना नुकतेच पुत्ररत्न झाले व राज ठाकरे आजोबा झाले. शर्मिला ठाकरेही आजी झाल्यात.
राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण समारंभ शुक्रवारी संपन्न झाला. त्यांच्या नातवाचे नाव किआन असे ठेवण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर लगेचच किआन या नावाचा नेमका अर्थ काय, अशी चर्चा सुरू झाली. किआन या नावाचे अनेक अर्थ निघतात. या नावाचा अर्थ देवाची कृपा, प्राचीन, राजेशाही असा आहे. अलीकडच्या काळात आई-वडिलांच्या नावांची आद्याक्षरं एकत्र गुंफून नाव ठेवण्याच्या ट्रेंडची चलती आहे. ‘किआन‘च्या नामकरणाच्या निमित्ताने ठाकरे घराण्यानेही नव्या पिढीच्या ट्रेंडला पसंती दिल्याचे दिसत आहे.
किआनचा जन्म ५ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळातून आणि मनसैनिकांनी ठाकरे घराण्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. अलीकडच्या काळात बॉलीवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या मुलांना प्रचंड प्रसिद्धी मिळताना दिसते. हे स्टार किडस् नेहमीच चर्चेचा विषय असतात. राज ठाकरे यांच्याभोवती असलेले वलय पाहता त्याचा नातू किआनही अशाचप्रकारे प्रकाशझोतात राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आमचं पूर्ण आयुष्य आता या चिमुकल्याभोवतीच फिरत आहे, असं राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत म्हटलं होते.
अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी झाला होता. हा विवाह सोहळा परळ येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये पार पाडला होता. या सोहळ्यास राज्यातील राजकीय नेत्यांसह, चित्रपट आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मिताली या फॅशन डिझायनल आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून शिक्षण घेतले. राज ठाकरे यांची कन्य उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री असून दोघींनी मिळून काही वर्षांपूर्वी ‘द रॅक’ हा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.