पुणे: दीक्षा पारवे हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झाले आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धालेवाडी या गावात दीखा राहते. उंच खडक असलेल्या या भागात झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तिने घाटात बैल जुंपला होता. तिचा हा व्हीडिओ व्हायरल झाला. तिच्या साहसाचे सगळ्यांकडून कौतुक करण्यात आले. जुन्नरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुद्धा तिचा व्हीडिओ शेअर करत तिचे कौतुक केले.
दहावीत शिकणारी दीक्षा शाळेला सुटी असेल त्यादिवशी बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी जाते. बैल उडी मारत असताना दीक्षाने त्याला शांत केले. त्यानंतर तिने हा बैल गाड्याला जुंपला. तिचा व्हीडिओ कुणीतरी शूट करून व्हायरल केला. दीक्षा चार ते पाच वर्षांपासून घाटात बैलांना सांभाळते. तिच्या आजोबांपासून पारवे परिवार बैलांना सांभाळतो. दीक्षाच्या दोन बहिणी, वडिल व सारेच कुटुंबीय घाटात बैलगाडा शर्यतीसाठी जातात. घाटात व बैलगाडा शर्यतीत बैल जुंपणे हे पुरुषांचे काम आहे. दीक्षाने बैल जुंपायला सुरुवात केली, तेव्हा अनेकांनी तिला हे काम करण्यापासून रोखले. टोमणे मारले, पण दीक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. ती आपले काम करीत राहिली. बैल जुंपण्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा अख्खा महाराष्ट्र दीक्षाचे कौतुक करू लागला त्यावेळी गावकऱ्यांना तिच्या प्रयत्नांचे महत्व पटले.
वयाची अवघे पंधरा वर्षे गाठलेली दीक्षा कुस्तीही खेळते. अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये तिने सहभाग घेतला आहे. बैलगाडा शर्यतीवर आतापर्यंत महाराष्ट्रात बंदी होती. तरीही दीक्षा घाटात बैल नेऊन सराव करायची. टेम्पो, पीकअप व्हॅन, दुचाकी अशी अनेक वाहने तिला चालविता येतात. शेतातील सगळी कामेही तिला येतात. व्हीडिओ व्हायरल झाल्यापासून अनेक जण तिच्यासोबत सेल्फी काढुन घेत आहे. धालेवाडीची ही मुलगी त्यामुळे सेलिब्रिटी झाली आहे.