Political News : देशात आयपीएल प्रमाणेच निवडणूक काळात देखील बुकी आणि सट्टा बाजार तेजीत येतात. लोकसभा निवडणुकीतल्या सर्व हालचालींवर सट्टा बाजारातल्या बुकींनी लक्ष वेधले आहे. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात 20 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. मतदान झाल्यानंतर कोणता उमेदवार बाजी मारणार, कोण किती मतांच्या फरकाने निवडून येणार, एक्झीट पोल काय आहे, यावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे. अशातच सट्टा बाजार सक्रिय झाले आहेत. सट्टेबाज आपली पोळी भाजून घेण्यासाठी निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज लावण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक सभा, रॅली, बैठकीकडे लक्ष वेधून होते.
बुकिंच्या अंदाजाप्रमाणे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे आणि महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यात काट्याची टक्कर होईल. यानुसार गुरुवार 18 एप्रिल रोजी मतदानापूर्वी सट्टा बाजारात भाजप उमेदवार सुनील मेंढे यांचा दर 55 पैसे तर डॉ. पडोळे यांचा दर 1.20 रुपये होता. मात्र 24 तासांत यात मोठा बदल झाला आहे. शनिवार 20 एप्रिल रोजी सट्टा बाजारात पडोळेंचा भाव 65 तर मेंढेंचा भाव 55 असा होता. शुक्रवार 19 एप्रिल रोजी रात्री मतदानाची अंतिम टक्केवारी उशिरा समोर आल्याने सट्टेबाजांनी लवकर भाव उघडलेच नव्हते. त्यामुळे आज शनिवारी सट्टा बाजारात जोरदार उलाढाल होईल, सट्टा बाजारातील सूत्रांकडून अशी माहिती आहे. परंतु याबाबत मोठ्या बुकींनी अजूनही गुप्तता बाळगली असून रात्रीपर्यंत ते भाव उघडकीस आणतील असे सांगण्यात आहे.
सट्टाबाजारातील महत्वाचे वैशिष्टे म्हणजे जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जास्त भाव दिला जातो. मेंढे आणि पडोळेंमध्ये सध्या अटीतटीची लढत दिसून येत आहे. सहसा मतदानाची आकडेवारी येताच बुकी भाव जाहीर करतात. परंतु यावेळी मोठ्या बुकींनी याबाबत कमालीची गुप्तता बाळगली असल्याने आज शनिवार रात्री उशिरापर्यंत मोठ्या बुकिंकडून भाव उघडले जातील आणि त्यानंतर यात आणखी बदल होईल अशी माहिती आहे.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा माहोल असला तरी सट्टेबाजांनी लोकसभा निवडणुकीला प्राथमिकता दिली आहे. सध्या भंडारा गोंदिया मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेल्या बुकिंनी सुनील मेंढेंवर कमी पैसे लावून त्यांच्या विजयाची शक्यता वर्तविली आहे. परंतु प्रशांत पडोळे फेव्हरेट ठरू शकतात. अशी माहिती सट्टा बाजारातून सांगण्यात येत आहे. इतर उमेदवारांबाबत मात्र बुकी फारसे उत्साही दिसत नाहीत. 19 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर कोणाच्या हाती विजयाचा झेंडा राहील यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कोणता उमेदवार बाजी मारणार आणि कोणता पक्ष सत्तेवर येणार याबाबतचा अटीतटीचा जुगार जोरदार रंगू लागला आहे.
18 उमेदवार भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. यात महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे आणि आघाडीचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यात थेट लढत होती. या दोन्ही उमेदवारांसाठी दोनही पक्षाच्या स्टार प्रचारकांनी रॅली आणि सभा घेतली. मतदानापूर्वी आणि मतदानानंतर या मतदारसंघातील सट्टाबाजार वेगाला आले आहे. आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता सांगितली जात आहे. त्यामुळे कोणाचा भाव बदलणार आणि कोण आघाडी घेणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदानाची अंतिम टक्केवारी 64.72 टक्के आहे. यात भंडारा – 64.55 टक्के, गोंदिया – 61.41टक्के, साकोली – 68.98 टक्के, तुमसर – 63.51 टक्के, तिरोडा – 61.10 टक्के, अर्जुनी मोरगाव – 68.79 टक्के अशी 6 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी आहे.