पुणे: गुलाब हे नाव घेताच प्रेम, उबदारपणा आणि सकारात्मकतेची भावना आठवते. गुलाब बहुतेकदा प्रेम आणि मैत्रीचे प्रतिक म्हणूनही एकमेकांना दिला जातो. या फुलाच्या सौंदर्याची जगभरात प्रशंसा केली जाते. गुलाबाचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायक फायदेही आहेत. पण गुलाबाच्या शेतीतून उत्पन्नही मिळविता येते.
गुलाब फुलाचे पीक एकदा लागवड केल्यानंतर त्याच जमिनीत पाच ते सहा वर्षे राहते. हे पीक वर्षानुवर्षे येत राहते. त्यामुळे शेतीतील लागवडीसाठी योग्य जमीन निवडावी. गुलाबाचे पीक सातत्याने येते. गुलाबाची मुळे आडवी जास्त पसरतात, त्यामुळे जमीन ४०-४५ सेंटीमीटर खोलीची निवडावी. अतिशय हलकी जमीन असणे किंवा अत्यंत भारी जमीन असणे हे गुलाबासाठी अयोग्य आहे. पिकाच्या वाढीसाठी आणि चांगल्यापद्धतीने फुल भरण्यासाठी १५-३० अंश सेल्सिअस तापमान असावे लागते. गुलाबाचे फुल भरण्यासाठी हिवाळी हंगाम हा उत्तम असतो. नोव्हेंबर-फेब्रुवारी या कालावधीत उत्तम प्रतीची भरपूर गुलाबाची फुले मिळतात. उत्तम प्रतीच्या फुलासाठी रात्रीचे तापमान १४-१६ अंश सेल्सिअस असावे लागते. उन्हाळ्यात (एप्रिल ते जुलै ) उष्ण व कोरड्या हवेमुळे गुलाबाची वाढ खुंटते, बहर कमी येतात. गुलाबाची गुणवत्ताही चांगली नसते. पावसाळी हवामानातील ढगाळ वातावरणामुळे झाडाची वाढ व फुलांच्या गुणवत्तेस हानी होते.
गुलाब शेतीसाठी आकर्षक, मोठे असणारे गुलाब विविध रंगी व सुवासिक फुले असणारी आणि दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात निवडावी. बाजारात मुख्यत्वे करून ग्लॅडिएटर, रक्तगंधा, अर्जुन, सुपरस्टार, लेडी एक्स, पापा मिलन, ब्लू मून, डबल डिलाइट, पॅराडाइज, ख्रिश्चन डायर, ओक्लोहोमा, अमेरिका हेरिटेज, लॅडोस, पीस इत्यादी जातींना मागणी असते. गुलाबाची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते. मुख्यतः पावसाळी हंगामातील लागवडही उत्तम व यशश्वी होते. लागवडीसाठी उन्हाळ्यात खत-मातीने खड्डे/चर भरून पावसाळ्याच्या सुरवातीला जून-जुलै महिन्यात लागवड करावी. जेथे पाऊस जास्त आहे अशा ठिकाणी ऑक्टोबर किंवा फेब्रुवारीत लागवड करावी.
गुलाबाच्या कलमांची सुरवातीच्या काळात काळजी घ्यावी. पाण्याचा जास्त ताण पडू देऊ नये. कलम रुजेपर्यंत थोडे-थोडे वारंवार पाणी द्यावे. नंतर मात्र आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. गुलाबाला ठिबक सिंचन केल्यास अतिउत्तम व प्रभावी ठरते. आपल्या जवळच्या बाजारपेठेसाठी फुले किंचित उमलू लागल्यावर फुलांची काढणी करावी. काढणी केल्यानंतर जे दांडे असतील ते पाण्यात राहतील इतके पाणी बादलीत असावे. काढणी झाल्यावर काढलेल्या दांड्यांना खालून पुन्हा २ सेंटीमीटर अंतरावर कट घ्यावा. फुले लगेच बाजारपेठेत पाठवावयाची नसतील तर ४-६ अंश सेल्सिअस तापमानाला ६ ते १२ तास शीतगृहात साठवावीत. प्रत्येक झाडापासून पहिल्या वर्षी सरासरी २० ते २५, दुसऱ्या वर्षी ३० ते ३५, तिसऱ्या वर्षापासून ५० ते ६५ फुलांचे उत्पादन मिळते.