Akola : अकोला शहरात आतापर्यंत महिला व विद्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फक्त एकच दामिनी पथक कार्यरत होते. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभर दामिनी पथक कार्यरत करण्यासाठी विषेश पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने यासाठी 34 दुचाकी वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
मार्च 2024 पासून अकोला जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनस्तरावर दामिनी ‘मार्शल’तर्फे महिला व विद्यार्थिंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गस्त सुरू करण्यात आली आहे. 9 ते 20 मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील दामिनी मार्शलने एकूण 89 जोडप्यांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. 405 शाळा व कॉलेजेसला भेट दिली आहे. एकूण 109 शाळा व कॉलेजमध्ये महिला सुरक्षेच्या संबंधित जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
अकोला जिल्ह्यात 23 पोलिस स्टेशन आहेत. अकोला शहरातील 8 पोलिस स्टेशनला प्रत्येकी दोन दुचाकी वाहने व ग्रामिण भागातील 15 पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक दुचाकी वाहन अशी एकूण 31 वाहने दामिनी ‘मार्शल’ला महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रभावी गस्तीसाठी पुरविण्यात आली आहेत. दामिनी ‘मार्शल’ रोज सकाळी सात ते नऊ, सकाळी 11 ते दुपारी दोन, सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत गस्त घालतात. गस्तीदरम्यान दामिनी मार्शल सकाळी व सायंकाळी त्यांच्या हद्दीत असलेल्या शाळा, कॉलेजेला भेट देतात. मार्शलतर्फे शाळा व कॉलेजेसमध्ये महिला जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहेत. महिलांसंबधित असलेले हेल्पलाइन नंबर व इतर सुविधांबाबत देखील त्यांच्याकडून मार्गदर्शन केले जात आहे.
सुरक्षात्मक उपाय
पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये महिला संबंधित असलेल्या संवेदनशील ठिकाणी भेटी देऊन ‘क्यूआर कोड स्कॅन’ करण्यात येतो. गस्तीदरम्यान एखादे जोडपे असभ्य वर्तन करताना निदर्शनास आल्यास, एखादी पीडित महिला आढळल्यास दामिनी ‘मार्शल’ मदत करतात.
अल्पवयीन मुले-मुली दिसल्यास त्यांना समज देऊन सोडण्यात येते. पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दामिनी पथकाची प्रसंगी मदत घेण्याचे आवाहन केले आहे. यासासाठी हेल्पलाइन क्रमां 112 किंवा दामिनी हेल्पलाइन क्रमांक 7447410015 सुरू करण्यात आला आहे.