Mumbai : भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसचे नेते राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसची ही चळवळ 14 जानेवारी 2024 रोजी मणिपूरमधील थौबल गावातून सुरू झाली. आता 63 दिवसांनंतर या यात्रेचा समारोप रविवार (ता. 17) मुंबईत झाला. समारोप सभेसाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. कार्यक्रमात इंडिया आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.
इंडिया आघाडीच्या जाहीर सभेत राहुल गांधी म्हणाले, मागील वर्षी कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत यात्रा केली. कन्याकुमारी पासून कश्मीरपर्यंत चार हजार किलोमीटर चालावे लागेल, असे कधीच वाटले नव्हते. देशाची कम्युनिकेशन सिस्टम, मीडिया, सोशल मीडिया आता देशाच्या हातात नाही. त्यामुळे ही यात्रा करावी लागली, बेरोजगारी, महागाई, अग्नीवीर, शेतकऱ्यांचे मुद्दे मीडियात दिसणार नाहीत. त्यामुळेच ही यात्रा काढावी लागली. देशातील संपूर्ण विरोधी पक्ष यात्रेत सहभागी झाल्याचे राहुल म्हणाले.
शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही या यात्रेत सहभाग घेतला. आपल्यावर अमेरिकेच्या कंपनीचा दबाव आहे. भाजप विरोधात आम्ही लढत असल्याने खूप चर्चा होत आहे. आम्ही एका राजकीय पक्षाच्या विरोधात लढत आहोत, असे जनता आणि देशाला वाटते. हे खरे नाही. आम्ही राजकीय पक्षाच्या विरोधात लढत नाही. भारताच्या तरुणांना ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. हे सर्व लोक नरेंद्र मोदी विरोधात लढत आहेत. आम्ही एका व्यक्ती विरोधात आणि भाजप विरोधात लढत नाही, तर विचारधारेविरोधात लढत आहोत. मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा दावाही राहुल यांनी केला. राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशिन मोदींच्या जिंकण्याचे कारण असल्याचे सांगितले.
मोदी केवळ मुखवटा
नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा असल्याचे राहुल म्हणाले. मोदी एक अभिनेता आहेत. मोदी एक पोकळ व्यक्ती असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. देशाची परिस्थिती बदलण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची परिस्थिती बदलली पाहिजे. देशात मोदी की गॅरंटी चालणार नाही. मुंबईतून महात्मा गांधींनी ‘चले जाओ’ म्हणत इंग्रजांना हकलून लावले होते. आता याच मुंबईतून भाजपला ‘चले जाओ’ म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शरद पवार यांनी करीत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरेंची मशाल पेटली
अब की बार भाजप तडीपार हा नारा आपण दिला आहे. कुणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. देशाच्या जनते समोर हुकूमशहा कितीही मोठा असला तरी ज्यावेळेला सगळे एकवटतात तेव्हा हुकूमशहाचा अंत होतो. आता देशात हुकूमशाही संपविण्याची वेळ आली आहे, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.