Home » RTMNU News : विद्यापीठाच्या अधिसभेत ‘रामजन्मभूमी न्यास’चा मुद्दा तापला

RTMNU News : विद्यापीठाच्या अधिसभेत ‘रामजन्मभूमी न्यास’चा मुद्दा तापला

Ayodhya Ram Mandir : विद्यापीठात प्रस्ताव मांडण्यावरुन वादंग

by admin
0 comment

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक सोमवारी 11 मार्च रोजी झाली. अधिसभेच्या बैठकीमध्ये सदस्य डॉ. योगेश भुते यांनी राममंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त रामजन्मभूमी न्यासच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. विद्येच्या मंदिरात ‘रामजन्मभूमी’च्या अभिनंदनाचा प्रस्ताव आल्याने शैक्षणिक वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. नागपूर विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यात मागील अधिसभेच्या कार्यवृत्तावर चर्चा करण्यात आली. 2024-25 मधील शैक्षणिक वर्षाचा 605 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेले राममंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला करण्यात आली. यासाठी रामजन्मभूमी न्यासचे अभिनंदन करावे असे प्रस्तावात म्हटले आहे. डॉ. योगेश भुते यांच्या प्रस्तावावर शैक्षणिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. विद्यापीठ असा प्रस्ताव मांडण्याचे ठिकाण नाही, अशी टीका होत आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकारिणींवर गेल्या काही वर्षांपासून भाजप परिवारातील भारतीय जनता युवा मोर्चा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंचाचे वर्चस्व आहे. त्यामुळे विद्यापीठामध्ये उजव्या विचारसरणीचे कार्यक्रम राबविले जातात असा आरोप होत आहे.

अलीकडेच झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या नमो युवा महासंमेलनासाठी विद्यापीठाने जागा दिल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यानंतर आता अधिसभेच्या बैठकीत ‘रामजन्मभूमी न्यास’चा अभिनंदन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने पुन्हा जोरदार टीका होत आहे. सोमवारच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर बैठक स्थगित करण्यात आली. आता पुढील बैठक 22 मार्च रोजी होईल. यावेळी या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

प्रस्तावावर मौन

डॉ. योगेश भुते यांनी मांडलेल्या प्रस्तावासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर मौन बाळगले. 22 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये प्रस्ताव चर्चेला आल्यावर या विषयावर बोलेल, असे डॉ. भुते म्हणाले.

वादाचा मुद्दा

अधिसभेत सदस्यांनी विषय मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाच्या धार्मिक भावनांचा आदर आहे. मात्र विद्यापीठ आणि ‘रामजन्मभूमी न्यास’ यांचा काहीही संबंध नसताना शैक्षणिक क्षेत्रात असे विषय चर्चेला आणल्यामुळे अनेक शंका उपस्थित होतात. अशा प्रस्तावातून शैक्षणिक क्षेत्राच्या भगवीकरणाचा जो आरोप होतोय तो खरा असल्याचे दिसून येते. विद्यार्थीकेंद्रीत योजना आणि ‘रामजन्मभूमी न्यास’चा काहीही संबंध नाही, असे युवा ग्रॅज्युएट फोरम प्रमुख अतुल खोब्रागडे म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!