Home » Police Patil Salary : पोलिस पाटलांना आता मिळणार 15 हजार रुपये

Police Patil Salary : पोलिस पाटलांना आता मिळणार 15 हजार रुपये

Parinay Fuke : राज्य मंत्रिमंडळात निर्णय; डॉ. परिणय फुके यांची मध्यस्थी

by नवस्वराज
0 comment

Mumbai : राज्यातील पोलिस पाटलांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. 13) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस पाटलांचे मानधन सलग दुसऱ्यांदा दुपटीने वाढविण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिस पाटलांचे मानधन 3 हजार रुपयांवरून 6 हजार 500 करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा सरकारने मानधनात दुपटीने वाढ करून हे मानधन 15 हजार केले आहे. माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासाठी भक्कम पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत मंत्रिमंडळाने मानधन वाढीचा निर्णय घेतला आहे. गोंदियातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाने यासाठी लढा सुरू केला होता.
राज्यभरात सुरू असलेल्या या लढ्याची दखल घेत माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यासंदर्भात सरकारशी चर्चा करणार असल्याची ग्वाही पोलिस पाटलांना दिली होती. काही दिवसांपूर्वी गोंदिया येथे पोलिस पाटलांची जिल्हास्तरीय कार्यशाळा, मेळावा व ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलिस पाटलांच्या सत्कार करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांनी पोलिस पाटलांना मानधान वाढीबाबतचे वचन दिले होते. त्याच कार्यक्रमात डॉ. परिणय फुके यांनी पोलिस पाटील भवनाच्या उभारणीसाठी, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पोलिस पाटलांच्या संघटनेला प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती.

पोलिस पाटलांच्या मानधनाचा मुद्दा ऐकल्यानंतर फुके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मानधनात वाढ करून घेऊ असे सांगितले होते. गोंदियातील कार्यक्रम संपल्यांनतर लगेचच डॉ. फुके यांनी गोंदिया ते लाखनी प्रवास करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून लगेचच चर्चा केली. पोलिस पाटलांच्या समस्यांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले. पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली. चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानधन वाढीची ग्वाही दिली होती.

सलग दुसऱ्यांदा यश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. परिणय फुके यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस पाटलांचे मानधन 6 हजार 500 रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार बुधवार, (ता. 13) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस पाटलांच्या मानधनात 8 हजार 500 रुपयांनी वाढ करण्यात आली. आता पोलिस पाटलांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. 2019 पूर्वी पोलिस पाटलांचे मानधन केवळ 3 हजार रुपये होते. 2019 मध्ये पोलिस पाटील संघटनेने गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. फुके यांनी तेव्हाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यावेळी फडणवीस सरकारने पोलिस पाटलांचे मानधन 3 हजार रुपयांवरून 6 हजार 500 रुपये केले होते. आता पुन्हा एकदा फुके यांच्यामुळे पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ झाली आहे. पोलिस पाटलांच्या मानधनात पुन्हा दुपटीने वाढ करण्यासाठी परिणय फुके यांनी मोठी भूमिका निभावल्याने राज्यभरातील पोलिस पाटलांनी आनंद व्यक्त केला आहे.

काय करतात पोलिस पाटील?

प्रशासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणा यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे पोलिस पाटील. पोलिस पाटलाच्या मदतीने गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य करण्यात येते. गावामध्ये खून, दरोडा आकस्मिक मृत्यू किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, इतर बाबी घडल्यास पोलिस पाटील त्याची प्राथमिक माहिती घेऊन पोलिस स्टेशनला कळवितात. 1967 मध्ये महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम अमलात आला. तेव्हापासून पोलिस पाटील पदाला सरकारी दर्जा प्राप्त झाला. एका खेडे गावात एक किंवा त्यापेक्षा जास्त पोलिस पाटलांची नेमणूक केल्या जाऊ शकते. किमान दहावी पास व्यक्तीला पोलिस पाटील होता येते. पोलिस पाटील बनण्यासाठी लेखी परीक्षाही घेण्यात येते. त्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर जिल्हाधिकारी पोलिस पाटलाची नेमणूक करतात.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!