Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पदावरून निलंबित केले आहे. निलंबनाच्या विरोधात आता डॉ. चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. डॉ. चौधरी यांच्या निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. अंतिम सुनावणीदरम्यान न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला तसेच निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यावेळी राज्यपालांच्यावतीने राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. याचिकाकर्ते चौधरी यांच्यावतीने ॲड. सुनील मनोहर यांनी बाजू मांडली.
विकास कामांचा ठपका
विद्यापीठाच्यावतीने विविध विकास कामे करण्यात आली आहे. हे करताना कंत्राट न काढता एकाच व्यक्तीला कामे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी आपल्या अहवालात टेंडर कार्यवाही न करता कामे केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचा शेरा दिला. चौधरी यांच्या विरोधातील तक्रारींवरून राज्यपालांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. आमदार प्रवीण दटके यांनीही चौधरी यांच्या कार्यपद्धतीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. याप्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व मुकुलिका जवळकर यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. सोमवारच्या कामकाजात हे प्रकरण सतराव्या क्रमांकावर होते. वादग्रस्त कारवाई करताना नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करण्यात आले नाही, असा दावा चौधरी यांनी याचिकेमध्ये केला. मात्र त्यानंतरही चौधरींनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना निलंबित केले. आता डॉ. चौधरींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणाचा निकाल काय लागतो? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.