Sangli / Pune : पुण्यातील ड्रग्सचे सांगली कनेक्शन अखेर समोर आले आहे. पुणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले 300 कोटींचे 140 किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले. या प्रकरणी आयुब मकानदारसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे पोलिसांच्याकडून दिल्ली आणि पुण्यातल्या ड्रग्स कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्स प्रकरणी सकाळपासून चौकशी सुरू करण्यात आली. यामध्ये कुपवाड येथे मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स चा साठा असल्याच्या खात्रीलायक माहितीवरून पुणे पोलिसांच्या तपास पथकाने कुपवाड स्वामी मळा येथील एका गोडाऊन वर छापा टाकला. यामध्ये 140 किलो 300 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले
पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने कुपवाड स्वामी मळा येथील एका गोडाऊनवर छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी 140 किलोचे अंदाजे 300 कोटींचा एमडी ड्रग्सचा साठा हा मिठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी आयुब मकानदार यांच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वी अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत कुरकुंभच्या ‘अर्थकेम लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतून सांगलीमध्ये ‘एमडी’ पाठवण्यात आल्याचे समोर आले. त्याप्रमाणे सांगलीमध्ये गुन्हे शाखेची दोन पथके रवाना करण्यात आली. या ठिकाणावरून सुरुवातीला आयुब अकबरशहा मकानदार (वय 44, रा. कुपवाड, सांगली) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दहा किलो ‘एमडी’ जप्त करण्यात आले. अधिक तपास केला असता आणखी 130 किलो ‘एमडी’ आढळून आले. या प्रकरणात आणखी दोधांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.