अकोला : ऑगस्ट महिन्यात अकोला जिल्ह्यात सरासरीच्या ७६ टक्के कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात सुमारे ६० टक्के पाऊस कमी झाला आहे. पावसात खंड पडल्याने अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात खरीप हंगामावर संकट ओढवले आहे.
पावसाने जून महिन्यात धोका दिल्याने यंदाच्या हंगामात जुलै महिन्यात पेरण्यांना सुरुवात करण्यात आली. पुरेसा पाऊस झाल्याने जुलैमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र पुन्हा पावसाने धोका दिला. पावसात खंड पडल्याने सध्या कापसाच्या पिकावर संकट आहे. फुलोऱ्यात आलेल्या मूग, उडीद, सोयाबीनच्या झाडांवरील फुले गळून पडली. सुमारे ५० ते ६० टक्के फूलगळ झाली आहे. यामुळे साहजिकच उत्पादनात घट होणार हे निश्चित झाले आहे. ऑगस्टमध्ये अकोला जिल्ह्यात २१२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ ४९ मिमी झाला. बुलडाणा जिल्ह्यात १९५ च्या तुलनेत ७७ तर वाशीम जिल्ह्यात २१६ च्या तुलनेत ८६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
सुमारे २५ दिवसांचा खंड पावसात पडला आहे. त्यामुळे हलक्या जमिनीवरील पिके जागेवरच सुकू लागली आहेत. सोयाबीनच्या झाडांवर फुले लागली होती. या काळात आर्द्रता न मिळाल्याने फूलगळ झाली. मूग, उडदाची लागवडच यंदा कमी आहे. जे पीक लागवड झाले त्याला कमी पावसामुळे शेंग धारणा होऊ शकलेली नाही. कोरडवाहू पट्ट्यातील कापसाची वाढ खुंटलेली आहे.