अमरावती : महाराष्ट्रातील विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागांसाठी तब्बल ६०० जणांनी विनंती अर्ज राजभवनाकडे दाखल केले आहेत. या अर्जामध्ये तहसीलदार, डॉक्टर, पीएचडी धारक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.
विधान परिषदेसाठी काही आमदार नियुक्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांकडे असतो. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती राज्यपालांकडे अर्ज करतात. योग्य वाटणाऱ्या उमेदवारांना आमदार म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठीची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली होती. ही यादी आजही राजभवनात पडून आहे. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी थेट पंगा घेत ही यादी रोखुन धरली होती. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी आणि ठाकरे यांच्यातील शीतयुद्ध अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. आता कोश्यारीही पदावर नाहीत आणि ठाकरेही मुख्यमंत्री राहिलेले नाही; परंतु विधान परिषदेतील १२ आमदार नियुक्तीचा मुद्दा तसाच कायम आहे. सध्या हे प्रकर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी आहे.
अशात अमरावतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पखाले यांनी राजभवनात माहितीच्या अधिकारान्वये अर्ज दाखल करीत तपशिलवार माहिती मागविली. राजभवनाने दिलेल्या माहितीनुसार या १२ जागांसाठी ६०० जणांनी राज्यपालांकडे विनंती अर्ज सादर केले आहेत. परंतु नियुक्त्या का रखडल्या हा प्रश्न आरटीआयमध्येही अनुत्तरीतच राहिला आहे. साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण या क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्त राज्यपालांनी विधान परिषदेसाठी करतात. या दिग्गजांचा समाजाला फायदा व्हावा, असा यामागचा उद्देश आहे. वास्तविक सत्ताधारी पक्षांनी शिफारस केलेल्या व्यक्तींची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली जाते. सत्ताधारी पक्ष राज्यपालांकडे यांना आमदार करावे, अशी यादी पाठवते. त्यानंतर राज्यपाल योग्य तो निर्णय घेतात.