वर्धा : कविता ही मनुष्याचा अविभाज्य भाग असून ती त्यांच्या अंतरंगात असते. मनुष्याचे संपूर्ण आयुष्य कवितेने व्यापलेले असते. ही अंतरंगातील कविता ज्याला उमजली तो कवी होतो, अशा शब्दात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी मत व्यक्त केले.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रा. देविदास सोटे कविकट्टयाचे उद्घाटन भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर विविध ठिकाणाहून आलेले कवी राजन लाखे, प्रसाद देशपांडे व समन्व्यक ज्योत्स्ना पंडित यांची उपस्थिती होती.
राजन लाखे यांनी या कविकट्टयाचे वैशिष्ट्य सांगितले. हा कविकट्टा तीनही दिवस २४ तास चालू राहणार आहे. निवड समितीने १ हजार ५०० कवितांमधून ५४६ कविता या कविकट्ट्यासाठी निवडल्या असून विविध ठिकाणाहून आलेले कवी त्या येथे सादर करणार आहेत, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पाटील यांनी केले तर आभार प्रा. जयश्री कोटगीरवार यांनी मानले.